संपूर्ण देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाने हाहाकार मांडला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक आणि वेगाने पसरणारी आहे. त्यामुळे रुग्नसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. परंतू आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास भारत सरकारने मान्यता दिली आहे. सोमवार दि. 19/04/2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत व आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून सरकार जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि आता वाढणारी रुग्नसंख्या पाहता लसीकरण प्रक्रियेस गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु होईल आणि 18 वर्षावरील वयोगटातील सर्वांना कोरोना लस मिळू शकेल.
कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना 50 टक्के लस खुल्या बाजारात विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. आणि उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.पंतप्रधानांनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. शहरांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे.
कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस देशभरात दिल्या जात आहेत. लसीसाठी नोंदणी कशी करावी? यासाठी कोणती प्रक्रिया आहे, खासगी रुग्णालयांमध्येही कशी तरतूद आहे, याबाबत सरकारकडूनही माहिती देण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी इतर गोष्टींबद्दलही स्पष्ट माहिती दिलीय. विशेष म्हणजे पूर्वीप्रमाणेच सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस विनामूल्य असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये लस फी 250 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.
लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
लस घेण्यासाठी असलेली नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. आपल्या मोबाईल फोनवर किंवा संगणक ब्राऊझरवर
https://www. cowin.gov.in/या लिंकवर लॉगिन करा किंवा आरोग्य सेतू ॲप https://www.aarogyasetu.gov.in/
वर लॉगिन करा. आपला मोबाईल नंबर नाेंदवा, आपण पोर्टलद्वारे निर्धारित वेळ मर्यादेत लसीसाठी नोंदणी करु शकता. सुमारे चार लोक एका मोबाईल फोनवरुन लसीसाठी नोंदणी करु शकतात. बरेच लोक मोबाईल किंवा संगणकाचा वापर करु शकत नाहीत त्यांनी इतरांची मदत घ्यावी. किंवा आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन नोंदणी करु शकता.
कोविन पोर्टलवर बदल करण्याचे पर्याय आहेत का?
एकदा नोंदणी केल्यानंतर आपल्याला काही बदल नोंदवायचे असल्यास आपण ते बदलू शकता किंवा रद्द देखील करु शकता. जर आपण शहरात लसीचा पहिला डोस घेतला असेल, तर आपण दुस-या डोससाठी केंद्र देखील बदलू किंवा निवडू शकता.
अगोदर घेतलेल्या लसीचाच डोस घेणे आवश्यक आहे काय?
होय! अर्थात, लसीचा पहिला डोस कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्डकडून घेणे आवश्यक आहे, तसेच दुसरा डोस देखील घेणे आवश्यक आहे. कोविन सिस्टम आपल्याला लस उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रांची यादीची माहिती देईल.
लसीकरण प्रमाणपत्र म्हणजे काय? व त्याचा उपयोग काय?
लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवर तयार केलेल्या आपल्या खात्यातून देखील डाऊनलोड करु शकता. लसीकरण नोंदणीच्या वेळी आपण भरलेले सर्व तपशील (नाव, वय आणि लिंग माहिती) जतन केली जाते. त्याच आधारावर आपल्याला लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राचा उपयोग राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासांसाठी तसेच इतर देशांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी होऊ शकतो.